featured, केंद्र शासन, घडामोडी, शासकीय

नवीन भाडेकरू कायदा येणार : या असतील महत्वाच्या पाच तरतुदी !

Share

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार लवकरच विविध राज्यांमध्ये नवीन भाडेकरू कायदा लागू होणार असून यातील काही तरतुदी या महत्वपूर्ण असतील असे स्पष्ट झाले आहे.

केंद्र सरकारने देशभरातील सर्व राज्य सरकारांना टेनन्सी अ‍ॅक्ट म्हणजेच भाडेकरू कायद्यात बदल करण्याचे सूचित केले आहे. यासाठी केंद्रीय पातळीवर मॉडेल टेनन्सी कायद्याचा मसुदा तयार केला असून राज्यांनी याच्याशी सुसंगत असा कायदा बनविण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक, केरळ आदी राज्यांनी नवीन कायद्याच्या अंमलबजावणीचे संकेत दिले आहेत. तर महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये विद्यमान कायद्यात बदलाची तयारी सुरू आहे. दरम्यान, नवीन भाडेकरू कायद्यामध्ये अनेक नवनवीन तरतुदींचा समावेश असणार आहे. यातील प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत.

१) डिपॉजीटमध्ये होणार बदल :- नवीन कायद्यानुसार मासिक घरभाड्यापेक्षा तीन पट इतक्या रकमेची सिक्युरिटी डिपॉजीट घरमालकाला घेता येणार आहे. मात्र भाडेकरार होण्याआधी डिपॉजीट घेणे बेकायदा ठरविण्यात आले आहे. तसेच भाडेकरून घर खाली करण्याच्या एक महिना आधीच ही रक्कम भाडेकरूला परत करणे बंधनकारक राहणार आहे.

२) कराराआधी घर खाली करता येणार नाही :- नवीन तरतुदीनुसार घरमालक हा भाडेकरार पूर्ण होण्याआधी कोणत्याही परिस्थितीत घर खाली करू शकणार नाही. लागोपाठ काही महिन्यांचे घरभाडे थकल्यास अथवा घराचा गैरवापर होत असल्यास मात्र घर खाली करता येणार आहे.

३)…तर दुप्पट घरभाडे ! :- भाडेकरूने करार संपल्यानंतरही घर खाली न केल्यास घरमालक संबंधीत घराच्या विद्यमान भाड्याच्या दुप्पट रकमेची मागणी करू शकतो.

४) एक महिन्याची नोटीस आवश्यक :- भाडेकरूने घर खाली करण्यापूर्वी घरमालकाला एक महिन्याआधी नोटीस देणे आवश्यक असल्याचे नवीन तरतुदीनुसार बंधनकारक करण्यात येणार आहे. तर घराची पाहणी, रिपेअरींगच्या कामाची पाहणी तसेच कोणत्याही कामासाठी घरमालकाला यावयाचे असल्यास त्याला याची भाडेकरूला २४ तास आधी लेखी पूर्वसूचना द्यावी लागणार आहे.

५) जबाबदारी दोघांची :- भाड्याने घेतलेल्या घराच्या वास्तूची काळजी घेण्याची जबाबदारी मालक आणि भाडेकरू या दोघांची राहणार आहे. घरमालकाने वास्तूची डागडुजी केल्यास तो एक महिन्यानंतर घरभाडे वाढवण्याची मागणी करू शकतो. तर घर मालकाची डागडुजीची स्थिती नसल्यास भाडेकरू हा भाडे कमी करण्याची मागणी करू शकतो. याबाबतच्या वादांसाठी रेंट ऑथेरिटीकडे दाद मागता येणार आहे.


Share

Leave a Comment

Your email address will not be published.

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा